खासदार वाचवण्यासाठी धडपड, ठाकरेंचे शिलेदार पत्र घेऊन लोकसभा अध्यक्षांकडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । एकीकडे शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर आता त्यांचे खासदारही (Shivsena Mps) फुटीच्या मार्गावर आहेत. शिवसेनेच्या लोकसभेतल्या 18 खासदारांपैकी 12 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना खासदार राहुल शेवाळे या गटाचे प्रतोद असतील, तसंच हे खासदार पत्र घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Loksabha Speaker Om Birla) यांना उद्या भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दिल्लीमध्ये आहेत. या खासदारांना घेऊन शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) भेटण्याचीही शक्यता आहे.

एकीकडे दिल्लीमध्ये या घडामोडी घडत असतानाच शिवसेनेनेही पावलं उचलायला सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. आमचे गटनेते विनायक राऊत आहेत (Vinayak Raut), तसंच मूळ शिवसेना आमचीच आहे, हे या पत्रात सांगण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्षांना हे पत्र देण्यासाठी विनायक राऊत, राजन विचारे, बंडू जाधव, अनिल देसाई आणि अरविंद सावंत गेले होते.

विनायक राऊत हे शिवसेनेचे गटनेते तर राजन विचारे (Rajan Vichare) हे प्रतोद आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या लोकसभा खासदारांना व्हीप बजावण्याचा तसंच लोकसभेत कोणाला मतदान करायचं, हे सांगण्याचा अधिकार विचारे यांना आहे. तुमच्याकडे जर कोणी खासदार गटनेता किंवा प्रतोद म्हणून पत्र घेऊन आला तर त्या पत्रावर कोणतीही कार्यवाही करू नका. आमच्या खासदारांपैकी कोणी असं पत्र घेऊन आलं, तर मला माहिती द्या, अशी विनंती विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एक बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे लोकसभेचे 5 आणि राज्यसभेचे 3 खासदार उपस्थित होते. यामध्ये विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर हे पाच लोकसभेचे खासदार तर संजय राऊत, अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेच्या खासदारांचा समावेश होता. गजानन किर्तीकर हे दिल्लीत नाहीत, पण ते आमच्यासोबत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *