महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै ।आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या खासदारांनीही जाहीरपणे बंडाचे निशाण फडकवल्यानंतर आता दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे गटाच्या सोमवारी झालेल्या बैठकीला शिवसेनेचे १२ खासदार ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. हे सर्वजण मिळून लोकसभेत वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेचे बंडखोर खासदार मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिंदे गटाला सरप्राईज दिले जाऊ शकते. गेल्यावेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने सर्वांचेच अंदाज चुकवत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले होते. त्यानंतर आता शिंदे गटाला केंद्र सरकारमध्ये दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Shivsena rebel MP’s in Loksabha mays get one cabinet and one minister of state post in Modi govt)
शिंदे गटाला केंद्रात १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रीपद मिळावं, अशी मागणी केली जात आहे. त्याबाबत एकनाथ शिंदे बुधवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करतील, असे सांगितले जात आहे. याशिवाय, राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे आज दिल्लीत काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.