दिल्लीत पोहोचताच एकनाथ शिंदेंचा नवा दावा ; आमच्या सोबत …..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । शिवसेनेच्या आमदारांनंतर लोकसभेतील खासदारांकडून बंड करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसंच आपल्याबरोबर असलेल्या खासदारांचा गट एनडीएसोबत असल्याची माहिती या बैठकीत शिंदे देणार असल्याचे समजते. दिल्लीत पोहोचल्यानंतर शिंदे यांनी शिवसेना खासदारांच्या बंडाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही भाष्य केलं आहे.

‘शिवसेनेचे खासदार लवकरच आम्हाला भेटतील. आमच्याकडे १२ नव्हे तर १८ खासदार आहेत,’ अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. लोकसभेत शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत. हे सर्वच्या सर्व खासदार आपल्यासोबत असल्याची तिरकस प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. मात्र यातील सहा खासदार अजूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सहा खासदारांपैकीही काही खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात होत असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मी दिल्लीत आलो आहे. राज्यातील ओबीसींना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने याबाबतीत वकिलांशी सल्लामसलत करण्यात येईल,’ अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *