महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै ।राष्ट्रपती निवडणुकीत राज्यात भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना २०० आमदारांची मते मिळतील, हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा फोल ठरला. मुर्मू यांना १८१ तर विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना ९८ मते मिळाली.
मुर्मू यांच्या उमेदवारीला भाजपबरोबरच शिवसेनेच्या दोन्ही गटांचा पाठिंबा होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नाराजीमुळे मुर्मू यांना २०० आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता. पण राज्यात आमदारांच्या मतदानात फाटाफूट झालेली नाही. शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर १६४ मते मिळाली होती. अध्यक्षांनी मतदान केले नव्हते. शिंदे सरकारला १६५ आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे १५ मते वाढली होती. तसेच शिवसेनेबरोबर असलेल्या एका आमदाराचा पाठिंबा होता. भाजप आणि शिंदे गटाचा प्रत्येकी एक आमदार गैरहजर होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ५१ तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. सिन्हा यांना ९८ मते मिळाली आहेत. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी विरोधात ९९ मते मिळाली होती. मुर्मू या आदिवासी समाजाच्या असल्याने या समाजातील विरोधी बाकावरील आमदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन सत्ताधाऱ्यांनी केले होते. तरीही राज्यात मतांची फाटाफूट झालेली नाही.