महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । बड्या मद्य व्यावसायिकांना शेकडो कोटींचा लाभ पोहोचविल्याच्या आरोपावरून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयकडून अटक होण्याच्या शक्यतेमुळे केंद्रातील मोदी सरकार आणि दिल्लीतील केजरीवाल सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या संघर्षाला सावरकर विरुद्ध भगतसिंह असा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे.
‘तुम्ही इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकरांची अपत्ये आहात. आम्ही इंग्रजांपुढे झुकण्यास नकार देत फासावर जाणाऱ्या भगतसिंगांची अपत्ये आहोत. तुम्ही कितीही सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया आणि केजरीवालला तुरुंगात टाका, फासावर चढवा. आणखी सिसोदिया, केजरीवाल तयार होतील. दिल्लीत पडलेली ही ठिणगी संपूर्ण देशात पसरण्यापासून कोणीही रोखू शकत नाही’, अशा आक्रमक शब्दात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शुक्रवारी मोदी सरकारला आव्हान दिले.