महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । सध्या यात्रेकरुंचा ट्रेन प्रवास सुखकर करण्याच्या विचारात रेल्वे मंत्रालय एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. (Ministry of Railway) रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना रेल्वे भाड्यात सूट देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. याआधी सैनिक, खेळाडू, पत्रकार अशा काही श्रेणींच्या प्रवाशांना रेल्वे भाड्यात सूट दिली जायची. मात्र कोरोना काळात ही सूट देणं बंद केलं होतं. (railway ministry give to concession to passengers in tickets)
आता कोरोनाचा (Covid-19) धोका कमी झाला असल्याने रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी भाड्यातील सूट सुरु करण्याचा विचार आहे. ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात रेल्वे प्रवास पुन्हा केव्हा सुरु होईल असा प्रश्न संसदेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना विचारण्यात आला आहे. यावर रेल्वे मंत्र्यांनी लेखी स्वरुपात उत्तर दिलं आहे.
यासंदर्भात रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की, कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या दोन वर्षात मिळालेले उत्पन्न 2019-20 आर्थिक वर्षातील उत्पन्नापेक्षाही कमी आहे. यामुळे रेल्वेवर मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. कोरोनामुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी घट झाली असताना तिकीटांवरील सवलतीचा परिणाम उत्पन्नावर होऊन वाईट परिणाम होईल. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सवलतीच्या तिकीटांची सेवा सुरु करणं सध्या शक्य नाही.
दरम्यान, कोरोनानंतर आता हळुहळू अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. येत्या काळात सकारात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास रेल्वे मंत्रालयाकडून पुन्हा सवलतीच्या तिकीटांची सेवा सुरु करण्याचा विचार आहे. रेल्वे भाड्यात सवलतींच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरलं होतं. सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे.