महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । दरवर्षी, बहुतांश नागरिक आखाडात सहकुटुंब तसेच मित्र परिवारासह आखाड पार्ट्यांचा बेत रचतात. त्याअनुषंगाने बाजारात मासळीला मोठी मागणी राहते. आखाडामुळे मासळीला मागणीही मोठी असून दरात तेजी आली आहे. महागड्या दरामुळे घरगुती सामिष खवय्यांनी मासळीकडे पाठ फिरवली असली तरी हॉटेल, रेस्टॉरंट चालकांकाडून मोठी मागणी आहे. आखाडामध्ये बहुतांश सामिष खवय्यांकडून सामिष पदार्थांवर ताव मारण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर गणेश पेठेतील मासळीबाजारात मासळीला मोठी मागणी राहते.
सध्या बाजारात खोल समुद्रातील मासळीची 7 ते 8 टन, खाडीची 200 ते 400 किलो, तर नदीच्या मासळीची 500 ते 1000 किलो इतकी आवक होत आहे. तर, आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 16 टन इतकी आवक होत आहे.कोरोनाचे निर्बंध संपल्याने यंदा शहरात आखाडी यात्रा, जत्रांसह आखाड पार्ट्या मोठ्या प्रमाणात होत आहेत.
मागणीच्या तुलनेत माल कमी प्रमाणात दाखल होत असल्याने मासळीच्या भावात वाढ झाली आहे. ऐन आखाडात मासळीचे भाव अवाक्याच्या बाहेर गेल्याने घरगुती सामिष खवय्यांनी मासळी खरेदीकडे पाठ फिरविली आहे. मात्र, कोरोनाच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदा आखाड साजरा होत असल्याने शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट चालकांनी आखाडी पार्ट्यांसाठी नियोजन केले आहे. त्यामुळे, याठिकाणाहून मासळीला मोठी मागणी होत असल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.