महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या घडामोडींपासून ही दिल्ली दौऱ्याची पाचवी खेप आहे. फडणवीस दिल्लीत पोहोचले असून एकनाथ शिंदे आज रात्री उशिरा दिल्लीकडे निघणार आहेत. (CM Eknath Shinde and Dy.CM Devendra Fadnavis on Delhi Visit)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत दाखल झाले आहेत. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आज पंतप्रधान मोदींची बैठक आहे. संध्याकाळी नरेंद्र मोदी हे भाजपच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी दिल्लीत संवाद साधणार आहेत. तर उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु शपथ घेत असल्याने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्लीत थांबणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दिल्लीत पोहोचतील.
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा सोमवार २५ जुलै रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार असून या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री हे आज रात्री दहा वाजता विमानाने नवी दिल्लीकडे प्रयाण करतील.