शिवसेना फुटली त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये ; राज ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात सत्तानाट्य घडले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन पायऊतार व्हावे लागले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर हे शक्यच झालं नसतं, असंही राज ठाकरे म्हणाले. ते झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राज ठाकरेंनी या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केलं. सध्या जीएसटी वाढवल्याने मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. यावर मिश्किल प्रतिक्रिया देखील राज ठाकरेंनी दिली. केंद्रातील मोदी सरकारच्या दूध, दह्यावर जीएसटी लावण्याच्या निर्णयाचा उल्लेख करत व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

माझ्यामते दूध, दह्यावर जीएसटी लावण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपवर जीएसटी लावला पाहिजे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. आत्ता दूध, दह्यावर जीएसटी लावण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपवर जीएसटी लावला पाहिजे. कारण त्यावर कुणाला वाटेल ते तो काहीही तेथे टाकत असतो. हल्ली सगळीकडे अगदी पत्रकारितेतही हीच गोष्ट झालेली आहे. अनेक स्तंभलेखक वेगवेगळ्या पक्षाचे झाले आहेत. स्वतंत्र पत्रकार खूप कमी उरले आहेत, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेना फुटली त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंचेच आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली. माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना म्हटले उगाच फुकटचे श्रेय नका घेऊ नका, जी गोष्ट घडली आहे ती गोष्ट नाही तुम्ही घडवली, ना अमित शाहांनी घडवली, ना भाजपने घडवली ना अजून कोणी घडवली. याचे श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावे लागेल. जी गोष्ट घडलेली आहे त्याचे तुम्ही श्रेय कसे काय काढून घेऊ शकता? कारण त्यांच्यामुळे हे काय एकदा घडले नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *