महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । गोरेगावातील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या १ हजार ३४ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या समन्सनंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे बुधवारी चौकशीला हजर राहिले नाहीत. दिल्लीमध्ये पावसाळी अधिवेशनासाठी हजर असल्याचे त्यांनी ईडीला कळवले होते. त्यामुळे आता ईडी त्यांना पुन्हा समन्स बजावण्याची शक्यता आहे.
पत्रा चाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू आहे. या दोन्ही प्रकरणांचा राऊत यांच्याशी संबंध जोडण्यात येत आहे. त्यामुळेच ईडीने चौकशीसाठी संजय राऊत यांना समन्स बजावून २७ जुलैला सकाळी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. दरम्यान, राऊत यांनी गेल्या समन्स वेळी वकिलांना ईडी कार्यालयात पाठवत दिल्लीत पावसाळी अधिवेशनासाठी हजर असल्याने चौकशीला हजर राहण्यासाठी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवडय़ानंतरची तारीख देण्यात यावी, अशी विनंती एका पत्राच्या माध्यमातून केली होती.