महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । शिवसेनेत बंडखोर शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनिकरणाशिवाय पर्याय नाही, असा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यांवरुन मिटकरी यांनी याबाबत ट्विट केलं आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला होता. (ShivSena Eknath Shinde group has not any option to merge with BJP says Amol Mitkari)
मिटकरी ट्विटमध्ये म्हणतात, “शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, असं चित्र सध्याच्या घडामोडींवरून निर्माण झालं आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीसांचा दिल्लीदौरा अचानक रद्द होणं आणि एकनाथ शिंदेंच एकटेच दिल्लीला जाणं? यावरुन महाराष्ट्रात लवकरच महाभारत होणार असल्याची चिन्हं आहेत”
शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही असेच साधारण सर्व घडामोडींवरून चित्र निर्माण झाले आहे .राज्यपालाच्या भेटीनंतर फडणवीसांचा दिल्लीदौरा अचानक रद्द होणे आणि शिंदे साहेब एकटेच दिल्लीला जाणे ? महाराष्ट्रात लवकरच महाभारत.@TV9Marathi @abpmajhatv @saamTVnews
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 27, 2022
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार लांबला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारी दिल्ली दौरा नियोजित होता. याआधी एकनाथ शिंदे ५ वेळा दिल्लीला जावून आले आहेत. आजचा त्यांचा सहावा दिल्ली दौरा होता. आता शिंदे उद्या दिल्लीला जावू शकतात असं सांगण्यात आलं आहे. मुंबईतील पूर्वनियोजित बैठकांमुळे हा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे.