“आमरण उपोषणावेळी शिंदेंनी आश्वासनं दिलं, दिलेला शब्द पूर्ण करा, हीच ती वेळ”, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मराठा तरूणांच्या रोजगारासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यात आली आहे. यात त्यांनी मराठा तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न मांडला आहे. अनेक मराठा तरूणांची नोकरीसाठी निवड झाली पण त्यांची नियुक्ती अद्याप झालेली नाही. त्यांची नियुक्ती होण्याबाबत त्यांनी मागणी केली आहे. “शासकीय सेवेत निवड होऊनही नियुक्ती न झालेल्या मराठा उमेदवारांना त्यांची ज्या पदांवर निवड झाली आहे, त्याच पदांवर नियुक्ती द्यावी, हा माझ्या आमरण उपोषणाचा एक मुख्य मुद्दा होता. त्यावेळी मंत्री असलेले श्री एकनाथजी शिंदे हे तत्कालीन सरकारचे प्रतिनिधी म्हणून मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन घेऊन आझाद मैदान येथे उपोषणस्थळी आले होते. आज ते स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत जी आश्वासने दिली होती, ती त्यांनी पूर्ण करावीत. अत्यंत संवेदनशील असणारा नियुक्त्यांचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तातडीने सोडवावा”, अशी फेसबुक पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिली आहे.


संभाजी छत्रपती यांनी काही मागण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी हे उपोषण केलं होतं. सरकारच्या वतीने मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील आणि अमित देशमुख यांनी संभाजी छत्रपती यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन दिलं. तसंच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. एवढेच नव्हे तर संभाजीराजे यांनी केलेल्या मागण्यांमध्ये आम्ही त्यात आणखी मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत, असं एकनाथ शिंदे तेव्हा म्हणाले होते. यानंतर संभाजी छत्रपती आणि त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी उपोषण सोडलं. तेव्हा दिलेलं आश्वासन पूर्ण व्हावं, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *