महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. सकाळपासून ईडीचे अधिकारी राऊत कुटुंबीयांची चौकशी करत आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना दोन वेळा समन्स बजावला होता. समन्स बजावल्यानंतरही संजय राऊत हे ईडीच्या चौकशीला हजर राहिले नाही. आज ईडीच्या टीमने सकाळी 7 वाजताच संजय राऊत यांच्या भांडुप येथील घर गाठले. या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, की संजय राऊतांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी होऊ द्या. त्यांना अटक होते की नाही हे मलाही माहिती नाही. मी ईडीचा अधिकारी नाही.’ पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की ‘ते तर म्हणाले होते मी काहीच केलेलं नाही. त्यामुळे कर नाही त्याला डर कशाला असायला पाहिजे. ते ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार बोलत होते. आज चौकशी होऊ द्या. त्यातून जे पुढे येईल ते तुम्हाला कळेलच. ते महाविकासआघाडीचे मोठे नेते होते. दररोज सकाळी 9 वाजता तुम्ही त्यांची बाईट घेत होते.’