महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबाद दौऱ्यावर असून सिल्लोड येथील आपले आमदार अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात त्यांचे शक्तिप्रदर्शन चालू आहे. यावेळी अब्दुल सत्तारांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. राजीनामा देऊन निवडून येण्याच्या आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याला सत्तारांनी आव्हान दिलं आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, भाजपचे रावसाहेब दानवे आणि इतर नेते उपस्थित होते.
रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे दोन नेते एकत्र आले तर काय होऊ शकतं हे लोकांना चांगलंच माहिती आहे असं म्हणत त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. त्याचबरोबर “आमच्यावर टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं की आपण कुणाचा हात धरून निवडून आलो आहोत. आदित्य ठाकरे म्हणाले की, राजीनामा देऊन परत निवडणूक लढवून दाखवा. तर मी सांगतो मला फक्त शिंदे साहेबांनी आदेश द्यावेत, लगेच मी राजीनामा देतो आणि परत निवडून येतो.” असं म्हणत आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याला सत्तारांनी आव्हान दिलं आहे.
मी मुस्लीम असूनही संपूर्ण शक्ती मी तुमच्यामागे जोडली आहे असं अब्दुल सत्तार बोलताना म्हणाले आहेत. “फक्त मराठवाड्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा पाठिंबा तुम्हाला आहे. राज्यात अनेक राजकारणी होऊन गेले पण एक आदर्श राजा आपल्याला लाभला ते म्हणजे शिवाजी महाराज. यांचं स्मारक बांधण्यासाठी आणि इतर कामासाठी मुख्यमंत्र्यानी निधी मंजूर केला आहे. मी एक मुस्लीम म्हणून जरी राहिलो तरी हिंदू बांधवाच्या भावना मी सांभाळतो.” असं सत्तार आपल्या भाषणात म्हणाले आहेत.