Bhagatsingh Koshyari : माझ्याकडून चूक झाली; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची माफी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ ऑगस्ट । मुंबईबद्दल केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली आहे. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

राजस्थानी आणि मारवाडी लोकांना मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकलं तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहणाच नाही असं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. त्याविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. सर्वच पक्षांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला होता. त्यावर राज्यपालांनी आज पदडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

दिनांक 29 जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.

गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे.आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतूकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.

महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *