पुण्यात आज शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने; तोफा धडाडणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ ऑगस्ट । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी (ता. २) पुणे दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत दिवसभरात जाहीर सभेसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, शिवसेनेचे नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचीही सायंकाळी कात्रज चौकात जाहीर सभा होणार आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्या राजकीय तोफा धडाडणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पंढरपूरला जाताना पुण्यात कार्यकर्त्यांकडून धावते स्वागत करण्यात आले. परंतु शिंदे यांच्या उपस्थितीत शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासून जाहीर सभेसह विविध कार्यक्रम होणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टी, पेरणी आणि विकासकामांबाबत आढावा घेणार आहेत. दुपारी १.२० वाजता फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पाची पाहणी करतील. दुपारी सव्वादोन वाजता ते श्री खंडोबा जेजुरी देवस्थान येथे जातील. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता सासवड पालखी तळ मैदानावर शिवसेना पक्षाची जाहीर सभा होणार आहे. सध्या राजकीय स्थित्यंतरामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असून, शिंदे हे कोणावर राजकीय तोफ डागणार, याकडे लक्ष लागून आहे.

आदित्य ठाकरेंची सभा

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्यात विविध ठिकाणी त्यांची ‘निष्ठा’ यात्रा आणि ‘शिवसंवाद’ यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर आदित्य ठाकरे हे मंगळवारी पुणे शहराच्या दौऱ्यावर असून, सायंकाळी पाच वाजता कात्रज चौकातील बस डेपोजवळ त्यांची जाहीर सभा होणार आहे. आदित्य हे शिवसेनेतील बंडखोरांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांना इडीने अटक केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या पार्श्वभूमीवर जाहीर सभेत ते नेमके काय बोलणार, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

उत्सवाबाबत बैठक

मुख्यमंत्री शिंदे रात्री साडेआठच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर आणि दत्त मंदिर येथे दर्शन घेतील. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास ते पोलिस आयुक्तालयात आगामी उत्सवासंदर्भात गणेश मंडळ व नवरात्र उत्सव मंडळांच्या बैठकीत चर्चा करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *