महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ ऑगस्ट । राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेना दोन भागांत विभागली गेली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट म्हणजे शिंदे गट अशा दोन गटात शिवसेना विभागली गेली आहे. दोन्ही गटातील शिवसैनिकांचा आपआपसातच संघर्ष सुरू झाला आहे. खरी शिवसेना कुणाची याबाबत कोर्टात दोन्ही गटांची न्यायालयीन लढाई सुरू आहे, मात्र उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक आमनेसामने येतात तेव्हा अनेकदा संघर्ष होतो. याबाबत आता थेट दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे हे शिंदे गटाविरोधात मैदानात आले आहेत. सामान्य शिवसैनिकांवर चुकीची कारवाई कराल आणि दबाव टाकाल तर थेट मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा केदार दिघेंनी दिला आहे. (Kedar Dighe Latest News)
हा इशारा नाही शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे!
ठाणे हा #शिवसेनेचा,#दिघेसाहेबांचा बालेकिल्ला…जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांना सत्तेचा वापर करून स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल,दबाव टाकाल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल! pic.twitter.com/aKopeVDD7q— Kedar Dighe (@KedarDighe1) August 2, 2022
केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेने आता ठाणे जिल्ह्याची जबाबदारी केदार दिघेंकडे सोपवली आहे. केदार दिघे यांची शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून अनेक ठिकाणी शिवसैनिकांवर हल्ले होत आहेत. याच पार्श्वभूमीवर केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना जाहीर इशारा दिला आहे.