महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ ऑगस्ट । पुणे येथे आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर झालेल्या हल्ला प्रकरणात शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांना पुणे पोलिसांनी बुधवारी (ता. 3) पहाटे साडेपाच वाजता मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यातून ताब्यात घेतले आहे. यासह सामंतांच्या वाहनावरील हल्ला प्रकरणी 6 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली.
तत्पुर्वी थोरात यांची पुणे येथे आणले गेले तर दुसरीकडे पोलिसांची ही कारवाई सुडबुध्दीची असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. त्यांच्यासह पुण्यात शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली.
हिंगोली येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात 1 ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी गद्दारांची वाहने फोडल्यास त्यांचा पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. या प्रकरणात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे येथे मंगळवारी सायंकाळी आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेला बबनराव थोरात यांना जबाबदार धरले जात आहे. त्यांना मंगळवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास मुंबई येथील काळाचौकी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांना तेथेच थांबवून त्यांची चौकशी करण्यात आली. तर आज पहाटे साडेपाच वाजता पुणे येथील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या पथकाने काळाचौकी पोलिस ठाण्यात येऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस त्यांना घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहेत.