जूनच्या पगारासाठी एसटीला हवेत 360 कोटी; सरकारने दिले 100, वेतनावर परिणाम नाही ; महामंडळाकडुन स्पष्टीकरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ ऑगस्ट । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांचा जून महिन्याचा पगार देण्यासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी ( २ ऑगस्ट) जारी करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या जूनच्या पगारासाठी ३६० कोटी रुपये इतक्या निधीची आवश्यकता होती. मात्र, आता तातडीने केवळ १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शासनाने मागणीपेक्षा कमी निधी दिला असला तरीही कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात कोणतीही अडचण येणार नाही,असे एसटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

एसटी महामंडळ गेल्या काही वर्षापासून तोट्यात आहे. लॉकडाऊनच्या काळात एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यानंतर महामंडळाला कर्मचाऱ्यांचा पगार करणे सुद्धा अशक्य झाले होते. वर्ष-दीड वर्षाच्या कालावधीनंतर एसटी सेवा सुरळीत झाली तरी प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महामंडळाला राज्य शासनावर अवलंबून राहावे लागत आहे.

अर्थसंकल्पात एसटीसाठी १४५० कोटींची तरतूद

राज्य सरकारने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात १ हजार ४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीतून एप्रिल आणि मे महिन्यांच्या पगारासाठी अनुक्रमे ३०० आणि ३६० कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे. आता जून महिन्यांच्या पगारासाठी ३६० कोटी रुपयांच्या निधीची मागणी एसटीने शासनाकडे केली होती. मात्र, सरकारने अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार शिल्लक ७९० कोटी रुपयांच्या तरतुदीमधून केवळ १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *