महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट। सर्वोच्च न्यायालायात आज शिवसेना, शिंदे गटाच्या भवितव्यावर सर्वोच्च सुनावणी सुरु असून सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी चालू आहे. सुनावणीदरम्यान पक्ष फुटीरतेचा बचाव पुरेसा होऊ शकत नाही असा सवाल कोर्टाने शिंदे गटाला विचारला आहे. आज दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद केला जात आहे. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे शिवसेनेची बाजू मांडत आहेत. तर शिंदे गटाकडून हरिश साळवे तसेच निरज कौल आणि महेश जेठमलानी हे युक्तिवाद करीत आहेत. तर राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता हेही कोर्टात राज्यपालांची बाजू मांडत आहेत.
आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सत्तासंघर्षाची ही सुनावणी विस्तारित पीठाकडे की, घटनापीठाकडे जाणार? किंवा निवडणूक आयोगाच्या नोटिशीला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आता उद्याच्या सुनावणीत मिळणार आहेत. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठाने आज सुनावणी केल्यानंतर ती पुन्हा उद्या होणार हे स्पष्ट केले. ते आता उद्या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.
गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय-काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील द्यायला सांगितला होता. 27 जुलैपर्यंत दोन्ही बाजूंना आपापले मुद्दे द्यायचे होते. त्यानुसार हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे सोपवण्याची गरज आहे की, नाही याचा विचार सुप्रीम कोर्ट आज करणार आहे.
या आहेत याचिका
1) एकूण 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान
2) राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशांना आव्हान
3) शिंदे गटाच्या प्रतोदाला शिवसेनेचा प्रतोद म्हणून मान्यता देण्यास आक्षेप
4) एकनाथ शिंदे यांचा शपथविधीला आणि विशेष अधिवेशनाला आक्षेप
राज्यात मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. यातच ईडीचा ससेमिरा लागलेल्या शिवसेना नेत्यांनी पक्षांतर सुरू केले. अशातच संजय राऊत यांनाही अटक झाली. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. आधी उद्धव सरकार तरते की, गडगडते याकडे लक्ष लागून राहिलेल्या जनतेला आता शिंदेशाही स्थिरावते की, कोसळते याचीही उत्सुकता आहे. त्याचाच आज फैसला होणार आहे.
घडामोडी
सर्वोच्च न्यायालयात एकूण चार याचिकांवर सुनावणी.
16 आमदारांच्या अपात्रतेवरही आज सुनावणी.
शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली.
शिवसेना कोणाची हा निर्णय निवडणूक आयोगाला घेऊ द्या.
तर शिंदे सरकार कोसळणार
आमदारांना अपात्र ठरवल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकते, असे जाणकार सांगत आहेत. तर सरकारच्या बाजूने निकाल आल्यास येत्या चार दिवसात राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे आजचा कौल कुणाच्या बाजूने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले. आजचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. तर निकालानंतर शिवसेनेचे अस्तित्वावरील प्रश्नावरही उत्तरे मिळणार आहेत.
घटनापीठावरही निर्णय?
शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली. यात शिवसेना कोणाची हा निर्णय निवडणूक आयोगाला घेऊ द्या, असे शिंदे गटाने याचिकेत म्हटले. त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट घटनापीठाची स्थापना करणार का? अथवा वेगळा आदेश मिळतो का? हेही समजेल. या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमना, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हेमा कोहली या तीन न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे.
‘या’ आमदारांचा आज फैसला
एकनाथ शिंदे,अब्दुल सत्तार, तानाजी सामंत, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, चिमणराव पाटील, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे. यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यांच्या संदर्भात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णयाची शक्यता असून आज या आमदारांचा फैसला होईल.
दिल्लीतून ग्रीन सिग्नल नाही
एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार नाही. त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही की त्यांच्याकडे आमदार संख्या वाढल्याने विस्तार होत नाही, असा चिमटा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काढला. “मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्यांचे अधिकार आहेत. उपमुख्यमंत्र्यांना खाते नाही. प्रत्येक फाइल मुख्यमंत्र्यांकडे जात आहे. मात्र सहीअभावी फायली थांबल्या आहेत. सह्या करायला मुख्यमंत्र्यांना वेळच नाही. उपमुख्यमंत्र्यांना अधिकारच दिलेला नाही,’ अशी टीका पवार यांनी केली.