महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । शुक्रवार, ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनास दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्षांत मंदिराचा पाया झाल्यानंतर चबुतऱ्याचे काम २० ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. सन २०२४ पर्यंत मंदिराचे गर्भगृह आणि पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण होणार आहे. मंदिराचे बांधकाम जोरात सुरू आहे. शहरात प्रवेशाच्या सहा मार्गांवर सहा भव्य द्वार बांधले जाणार आहेत. प्रत्येक द्वारनजीक पाच एकर परिसरात सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे भक्तनिवास आणि एक रुग्णालय असेल.
१२०० एकरांच्या नव्या भव्यदिव्य अयोध्येच्या पहिल्या टप्प्यात ४०० एकर परिसरातील काम लवकरच सुरू होत आहे. यात आंतरराष्ट्रीय संस्था, विविध राज्यांचे भवन, मठ, हॉटेल्स आदीसाठी सर्वात प्रथम भूखंड दिले जाणार आहेत. योगी मंत्रिमंडळाने अयोध्येतील कॉरिडॉरसाठी ८०० कोटींच्या खर्चाची तरतुदीस मंजुरी दिली आहे.
अयोध्येला एक आध्यात्मिक, ज्ञान आणि उत्सवांचे शहर अशा रूपात विकसित करण्यात येणार असून भाविकांसाठी पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत. त्यासाठी ३४ शासकीय विभाग आणि संस्था ३० हजार कोटीं रुपयांपेक्षाही अधिक खर्चाचे २४९ प्रकल्प बनवले आहेत. यापैकी सुमारे २५ हजार कोटींच्या १३५ प्रकल्पांवर विविध २६ संस्था काम करीत आहेत. मंदिर बांधकामासोबतच शहरासही भव्य स्वरूप देण्यासाठी काम सुरू आहे.