महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । एएनआय या वृत्तसंस्थेनं दिल्ल्या माहितीनुसार, संजय राऊतांशी संबंधित मुंबईतील दोन ठिकाणांवर मंगळवारी केलेल्या छापेमारीमध्ये महत्वाची कागदपत्रं हाती लागल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलाय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या तपासामध्ये संजय राऊत यांनी तीन कोटी रुपये रोख रक्कम देऊन अलिबागमध्ये १० प्लॉट विकत घेतले. या संदर्भात एचडीआयएलच्या अकाऊटंटचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. एचडीआयएलच्या माध्यमातूनच हे व्यवहार झाल्याचं सांगितलं जात आहे. राऊत यांच्या खात्यावर पैसे वळवण्याबरोबरच त्यांना प्रवीण राऊत यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले होते. हाच पैसा संजय राऊत यांनी अलिबाग आणि मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केलाय.
Sanjay Raut alleged money laundering case | ED officials say they recovered important documents in their raid at 2 locations in Mumbai yesterday. Officials say they found out that Sanjay Raut paid Rs 3 crores in cash to the sellers for 10 plots of land in Alibag.
— ANI (@ANI) August 3, 2022
राऊत यांच्या अटकेचे समर्थन करताना संचालनालयाचे सहायक संचालक डी. सी. नाहक यांनी रिमांड अर्जात म्हटले आहे की, पत्रा चाळ प्रकल्पात प्रवीण राऊत यांना मिळालेल्या ११२ कोटी तूर्तास एक कोटी सहा लाख रुपये संजय राऊत यांना मिळाले हे सकृद्दर्शनी दिसत असले तरी रोख रकमेच्या स्वरूपात राऊत यांना मोठी रक्कम मिळाली आहे.
पत्रा चाळ प्रकल्प हा सुरुवातीला मे. गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला म्हाडाने मंजूर केला होता. मात्र या कंपनीत संचालक असलेल्या प्रवीण राऊतने हा प्रकल्प म्हाडाकडून मंजूर होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासाठी संजय राऊत यांनी मदत केली, असा मुख्य आरोप आहे. या कंपनीतील प्रवीण राऊत यांच्या व्यतिरिक्त अन्य संचालकांच्या जागी हौसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लि.चे (एचडीआयएल) राजेश व सारंग वाधवान आले. हे सर्व प्रवीण राऊतनेच घडवून आणले. यासाठी पंजाब नॅशनल बँकेतून कर्ज उचलण्यात आले.
हे कर्जही बुडविण्यात आले. पत्रा चाळीच्या प्रकल्पावर नऊ विकासकांकडून ९०१ कोटी रुपये मिळविणे आणि बुडीत पंजाब नॅशनल बँकेकडून कर्जाची उचल या सर्व बाबी घडवून आणण्यात प्रवीण राऊतचा सहभाग होता. या सगळय़ासाठी संजय राऊत यांनी मदत केली. यामध्ये रोखीने कोट्यवधीचा व्यवहार झाला. त्यातूनच अलिबाग येथील भूखंड खरेदी केला गेला.