महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. पण, आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 8 ऑगस्टला ठेवली आहे. त्यामुळे निर्णय लांबणीवर जाणार आहे.
शिवसेना कुणाची या वादावर सुप्रीम कोर्टामध्ये आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही. यावेळी शिवसेनेच्या चिन्हाबद्दल कोणताही निर्णय़ घेऊ नका, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. तसंच, दोन्ही गटांच्या लिखित युक्तिवादावर निर्णय घेतला जाईल, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे निर्णय जाणार की नाही, याबद्दल सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे शिंदे गटामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची हालचाल सुरू आहे. कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होणार आहे. पण त्याआधी मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी समोर आली आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.
तर शिंदे गटातून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहे. जे शिवसेनेमध्ये मंत्री होते त्यांनाच मंत्रिपद दिले जात आहे.