महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवसभरातील सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत. सततचे दौरे आणि पहाटेपर्यंत चालणाऱ्या सभा यांमुळे मुख्यमंत्र्यांना थकवा आल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून शिंदेंना सक्त विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांनीही आजचे सर्व कार्यक्रम तातडीने रद्द केले आहेत. फडणवीस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टात निवडणूक चिन्हाबाबत कुठलाही निर्णय न घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाला दिल्याने भाजप सावध पावलं टाकण्याच्या पवित्र्यात असल्याचं चित्र आहे.
एकनाथ शिंदे यांनी २० जूनला बंड पुकारल्यानंतर सुरत-गुवाहाटी-गोवा असे त्यांचे मार्गक्रमण सुरु होते. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्यात आले. ३० जूनला मुंबईत येऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून त्यांचे सतत दौरे, सभा, भाषणं, पत्रकार परिषदा असे अतिव्यस्त वेळापत्रक पाहायला मिळत आहे.
गेल्या महिनाभरात रात्री-अपरात्री असोत, एक-दोन दिवसांचे असोत, तर कधी उघड आणि कधी गुप्त असे झालेले दिल्लीचे दौरे असोत, पंढरपूर वारी, महाराष्ट्र दौरा यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर ताण आला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना एक दिवस सक्तीचा आराम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.शिंदेंनी आज एक दिवसाच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत.