संजय राऊतांच्या अडचणीत वाढ ; आता कुटुंबाचा ईडीशी ‘सामना’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. संजय राऊत यांची आज ईडी कोठडी संपली. त्यामुळे त्यांची आज कोठडीतून सुटका होईल, अशी राऊत कुटुंबियांना आशा होती. पण राऊतांना आज कोर्टात हजर केल्यानंतर ईडीकडून जबरदस्त यु्क्तीवाद करण्यात आला. ईडीने राऊतांची आणखी चार दिवसांसाठी कोठडी मागितली. त्यामुळे कोर्टाने राऊतांना आणखी चार दिवसांसाठी ईडी कोठडी बजावली. कोर्टाच्या या निर्णयाने संजय राऊतांना तर धक्का बसलाच. पण ईडीच्या आणखी एक कारवाई संजय राऊतांना धक्का देणारी आहे. ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावलं आहे. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊत यांना पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून बरेचसे गैरव्यव्हार झाल्याच संशय ईडीला आहे. त्यातूनच हे समन्स बजावण्यात आलं आहे.

संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. जवळपास 1034 कोटींचा हा घोटाळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीने संजय राऊतांना दोनवेळा समन्स बजावले होते. पण राज्यसभेचं पावसाळी अधिवेशनाचं कारण देत संजय राऊतांनी चौकशीला जाणं टाळलं होतं. अखेर ईडी अधिकाऱ्यांनी 31 जुलैला सकाळी साडेसात वाजता संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी धाड टाकली. तिथे त्यांनी दिवसभर संजय राऊतांच्या मैत्री बंगल्याची झडती घेतली. तसेच राऊत कुटुंबांची चौकशी केली. ईडीचं एक पथक राऊतांच्या मुलीला घेवून त्यांच्या दादर येथील दुसऱ्या निवासस्थानी गेलं होतं. राऊतांच्या दादर येथील घरी देखील झडती घेण्यात आली होती. दिवसभर तपास केल्यानंतर राऊतांनी संध्याकाळी चार वाजता ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर ईडी कार्यालयात नेलं होतं. अखेर रात्री उशिरा ईडीने चौकशी करुन संजय राऊतांना अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *