महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । शिवसेना फुटीनंतर माजी मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पहिले यश मिळाले आहे. सोलापूरमध्ये ठाकरे यांच्या गटाचे पहिले खाते उघडले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आलेत.
सोलापूर जिल्ह्यातील पहिला निकाल हाती
शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटासोबत संघर्ष सुरु असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पहिलेचे मोठे यश मिळाले आहे. चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाचा मोठा आणि निर्विवाद विजय झाला आहे. ठाकरे गटाने चिंचपूर ग्रामपंचायतीमधील सर्वच्या सर्व म्हणजे सात जागा जिंकल्या आहेत.
चिंचपूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकल्याने ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालाने सोलापुरात वर्चस्व असणारे माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे शिवसेना संपवायला निघालेल्यांनी ही मोठी चपराक आहे, असा टोला शिवसेना नेत्यांकडून लगावण्यात आला आहे.
भाजप आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाला झटका माजी आमदार रतिकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाने जोरदार दे धक्का देत सत्ता आपल्याकडे राखली आहे. दक्षिण सोलापूर शिवसेना तालुकाप्रमुख धर्मराज बगले यांनी हे यश शिवसेना आणि जनतेचे असल्याचे म्हटले आहे.