Bhaskar Jadhav : शिवसेना आमदार भास्कर जाधवांची जीभ घसरली ; राज्यपाल कोश्यारी यांना दिली हि उपमा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑगस्ट । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची जीभ घसरली. राज्यपाल म्हणजे घरगडी आहेत, अशा खालच्या शब्दात भास्कर जाधवांनी निशाणा साधला. कोश्यारींनी मराठी माणसांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरुन लक्ष हटवण्यासाठी संजय राऊत यांना अटक केल्याचा आरोपही जाधव यांनी यावेळी केली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत भास्कर जाधव बोलत होते.

मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना संजय राऊत यांनी पत्र लिहिलं होतं. पाच ऑगस्टपर्यंत ईडीकडे त्यांनी वेळ मागितला होता. अधिवेशन संपल्यानंतर सात ऑगस्ट रोजी हजर राहण्याचंही सांगितलं होतं. पण राऊतांच्या पत्राला कोणतंही उत्तर न देता, लोकसभेचं अधिवेशन सुरू असतानाच ईडीने त्यांच्यावर कारवाई केली, असा आरोप भास्कर जाधवांनी केला.

‘मंत्रिमंडळाचा विस्तार होऊच नये. त्याची गरजच नाही. आता लोकांना लोकशाही काय आहे, ते समजले. बिनखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस सर्व कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचेच राबवतायत. म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार न होता भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम राबवला जावा अशा माझ्या शुभेच्छा आहेत.’ अशी तिरकस टीकाही भास्कर जाधवांनी केली.

देशात भाजपकडून दडपशाही सुरु असल्याची टीकाही भास्कर जाधवांनी केली. यापुढील शिवसेनेची लढाई खुल्या मैदानात होईल. एकाने दुसऱ्याला गिळावे, दुसऱ्याने तिसऱ्याला गिळावे हाच जगाचा न्याय खरा, हीच जगाची परंपरा, तू जपून टाक पाऊल जरा, तू जपून टाक पाऊल जरा, असेही जाधव म्हणाले. प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा करताना भाजप एकनाथ शिंदे यांचा पक्ष कसा वाचवणार? असा प्रश्नही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *