महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर! ईडी लावा नाहीतर सीबीआय लावा, मी घाबरत नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑगस्ट । देशात लोकशाही उरली नसून, चार लोकांची हुकूमशाही सुरू आहे. लोकशाहीची रोज हत्या होत आहे. याविरुद्ध जो कोणी आवाज उठवेल त्याच्या मागे तपास यंत्रणा लावल्या जातात. माझ्या मागे ईडी लावा नाहीतर सीबीआय लावा, मी घाबरत नाही, असे अव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिले. वाढती महागाई, बेरोजगारी, एकाधिकारशाही याविरुद्ध मी बोलतच राहणार. लोकशाही वाचविण्यासाठी आवाज उठवणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आंदोलनावेळी दिल्ली पोलिसांचा प्रचंड फौजफाटा रस्त्यावर तैनात होता. अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. काँग्रेस मुख्यालयाला पोलिसांनी घेरावा टाकला आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. बळाचा वापर करून आंदोलन करणाऱया नेत्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सरचिटणीस प्रियंका गांधी यांना अक्षरशः फरफटत महिला पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुल गांधीनाही पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. काँग्रेस नेत्यांची सहा तासांनंतर सायंकाळी सातच्या सुमारास सुटका करण्यात आली.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केंद्रातील मोदी सरकारची नीती आणि धोरणावर जबरदस्त हल्ला चढविला. एक एक वीट रचून हिंदुस्थान बनला आहे. मात्र, आपल्याच डोळय़ासमोर हे उद्ध्वस्त होताना पाहत आहोत. देशात लोकशाही हत्या होत आहे. लोकशाही उरलेली नाही. चार लोकांची हुकूमशाही सुरू आहे.

विरोधी पक्षांनी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला की त्यांचा आवाज दाबला जातो. अटक केली जाते. तुरुंगात डांबले जाते. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो. पण मी घाबरत नाही. ईडी लावा नाहीतर सीबीआय लावा, मी आवाज उठवणारच. सरकारच्या दडपशाहीविरुद्ध बोलणारच. महागाई, बेरोजगारी, समाजातील तणाव, हिंसाचार हे मुख्य मुद्दे आहेत. मी सत्य बोलतो म्हणून माझ्यावर जास्त हल्ले होतात, पण मी धमक्यांना घाबरत नाही.

हिटलरही निवडणुका जिंकत होता
आम्ही निवडणुका जिंकतो असा दावा भाजपाकडून केला जातो. यावर राहुल गांधींनी जोरदार फटकारले. हिटलरही निवडणुका जिंकायचा. त्याच्या ताब्यात सर्व संस्था, यंत्रणा होत्या, असे ते म्हणाले.

काळा शुक्रवार! गांधी कुटुंबाने केले आंदोलनाचे नेतृत्व
महागाई, बेरोजगारी, मनमानी पद्धतीने जीएसटी वसुली याविरुद्ध काँग्रेस पक्षाने आज देशभरात आंदोलन पुकारले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह सर्वच नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मार्च काढण्यात येणार होता. पंतप्रधान निवासस्थानालाही घेराव टाकण्यात येणार होता. सरकारचा निषेध करीत अनेक नेते, कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान केले होते. काळ्या फिती बांधल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *