Rain News : राज्यातील या जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस ; अनेक गावांचा संपर्क तुटला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑगस्ट । बीड जिल्ह्यातच ढगफुटीसदृश पाऊश झालाय. त्यामुळे शेतक-याचं प्रचंड नुकसान झालंय. रात्री परळी तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पांगरी लिंबोटा तळेगाव या गावातील भागात तर ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीये. छोटया, मोठ्या नद्या,नाले दुथडी भरून वाहिल्याने शेतात पाणी घुसून उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील चोंढी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी दीपक आरोटे यांच्या शेतातील कोथिंबीर आणि मका हे पीक पाण्यात वाहून गेले आहे. हाती आलेला घास पुराने हिरावून नेल्याने आरोटे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. तर शेतातील पिके तसेच मातीतील भरावच वाहून गेल्यानं पुन्हा शेती कशी करायची हाच प्रश्न त्यांना पडला आहे.

नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी बरबडा परिसरात मुसळधार पाउस झाला. शिवाय मांजरम आणि लोहा तालुक्यातील उमरा भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे कहाळा, पाटोदा, ममण्याळ, बरबडा भागात नाल्यांना पूर आला. या पुरामुळे या भागातील शेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. प्रामुख्याने या भागात घेण्यात येणाऱ्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. तात्काळ पंचनामे करून पिकविमा मिळवून देण्याची मागणी येथील शेतकरी करताहेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीच्या महापूर आला आहे. तर कुडाळ तालुक्यातील 27 गावांचा मुसळधार पावसामुळे संपर्क तुटला आहे. कुडाळ-मालवण रस्त्यावरील आंबेर पुलावर पाणी आले आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *