सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार ; 5G खर्चाची तुमच्याकडून वसुली होईल, 4G सेवाही महागणार!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑगस्ट । मैदा, तांदूळ, तेलानंतर आता लवकरच तुमच्या मोबाईलचे बिल वाढू शकते. या वाढीचे कनेक्शन थेट 5G शी संबंधित आहे. सध्याची 4G सेवा वापरून तुमची सुटका होईल असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकत आहेत. 5G स्पेक्ट्रम लिलावात करोडो रुपये खर्च करणार्‍या कंपन्या तुमच्याकडून एक-एक पैसा वसूल करतील. ही रक्कम वसूल करण्यासाठी त्यांच्याकडे दोनच पर्याय आहेत.

अधिकाधिक लोकांनी 5G सेवेकडे वळावे अशी कंपन्यांचे प्रयत्न असेल. अशा परिस्थितीत ते सध्याच्या ग्राहकांसाठी दर वाढवू शकतात. अशाप्रकारे 5G सेवा सुरू झाल्यानंतर 4G सेवा महाग होण्याचा मार्गही जवळपास मोकळा होईल. 5G स्पेक्ट्रमसाठी बोली संपली असून या लिलावात दूरसंचार कंपन्यांनी मोठी रक्कम खर्च केली आहे. ही रक्कम कंपन्या ग्राहकांकडून वसूल करणार का? हा प्रश्न आहे. तज्ज्ञांना तर असेच वाटते. खर्च केलेली रक्कम वसूल करण्यासाठी टेलकोस जास्त किमतीत 5G देऊ शकतात. एवढेच नाही तर ते 4G सेवेच्या किमती वाढवू शकतात असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

स्पेक्ट्रमसाठी कोणत्या कंपन्यांनी बोली लावली?
5G स्पेक्ट्रमसाठी बोली लावणाऱ्यांमध्ये रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि अदानी डेटा नेटवर्कचा समावेश आहे. त्यांच्याकडे ५१,२३६ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम आहे. यासाठी त्यांनी एकूण १,५०,१७३ कोटी रुपये खर्च केले आहेत, जे विश्लेषकांनी पूर्वी केलेल्या अंदाजापेक्षा जास्त आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या आक्रमक बोलीमुळे हे घडले आहे.

दरम्यान, ऑक्टोबरपासून 5G स्पेक्ट्रम सुरू होण्याची शक्यता असल्याचे दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. तर वर्षभरात ही सेवा देशभरात सुरू होईल. भारतात 5G सेवा सुरू करणारी रिलायन्स जिओ कदाचित पहिली असेल. अलीकडेच रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की कंपनी भारतात 5G सुरू करून स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करेल. तर एअरटेल आणि वोडाफोन आयडियाला 5G सेवा सुरु करण्यास थोडा विलंब होऊ शकतो. याचे कारण त्यांच्या पायाभूत सुविधांमधील आव्हाने मानले जात आहे.

मोबाईल बिल वाढण्याची शक्यता
नोमुराच्या अहवालात असे सूचित करण्यात आले आहे की, खर्च केलेले पैसे वसूल करण्यासाठी कंपन्यांकडे दोन पर्याय आहेत. पहिले म्हणजे जास्त किमतीत 5G सेवा उपलब्ध करून देणे आणि दुसरा पर्याय म्हणजे किंमत वाढवून विद्यमान ग्राहकांकडून खर्च केलेली रक्कम वसूल करणे. टॅरिफमध्ये ४ टक्के वाढ केल्याने दूरसंचार कंपन्या त्यांचे 5G खर्च भरून काढू शकतात. एवढेच नाही तर स्पेक्ट्रम खरेदीचा खर्च भागवण्यासाठी टेलकोस त्यांच्या 5G सेवा ३० टक्के जास्त दराने सुरू करू शकतात. नोमुरा हा जागतिक वित्तीय सेवा समूह आहे.

रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या मते, कंपन्यांनी लोकांना मोठ्या प्रमाणावर 5G स्वीकारावे असे वाटते. यासाठी दूरसंचार कंपन्या 4G सेवांसाठी दर वाढवू शकतात. आधीच कंपन्यांनी डिसेंबर २०१९ आणि नोव्हेंबर २०२१ मध्ये दोनदा दर वाढवले होते. याशिवाय चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात 4G सेवांमध्ये पुन्हा एकदा दर वाढण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *