महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । राज्यात पावसाने पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पुन्हा कोसळतोय. तळकोकणात तर पावसाने अक्षरश: थैमान घातल्याची बातमी समोर आली आहे. पावसामुळे अनेक नद्या धुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने ठिकठिकाणी गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसामुळे काही ठिकाणी दरडी कोसळल्याच्या देखील घटना समोर येत आहेत. विशेषत: रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या घाटात तशीच एक घटना समोर आली आहे. रत्नागिरीत रघुवीर घाटात मोठी दरड कोसळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना रघुवीर घाट जोडतो. हा घाट खेडमध्ये येतो. याच घाटात मोठी दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील 20 गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. सातारा जिल्ह्यातील 20 गावांना संपर्कासाठी असणारा हा एकमेव रघुवीर घाट आहे विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसांतील ही तिसरी घटना आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसांसाठी इशारा दिला आहे. हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्मण होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे.