महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. आता पुन्हा राज्यात शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जरी भाजपचे अच्छे दिन आले असले तरी आता बिहारमध्ये मात्र भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे बिहारमध्ये पुन्हा एकदा जेडीयू-भाजप युती तुटण्याच्या मार्गावर आहे. 11 ऑगस्टपर्यंत जेडीयू भाजपची साथ सोडू शकतं, असं समोर येत आहे. नितीश कुमार यांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली असून भेटीची वेळ मागितल्याची बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) आणि भाजपमध्ये (bjp) गेल्या अनेक दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे.मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीचे संबंध ताणले गेले आहे. त्यामुळे आता नितीशकुमार यांनी आता काँग्रेसची वाट निवडली आहे. नितीशकुमार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली असल्याची माहिती समोर आली आहे.
बिहारमध्ये नितीशकुमार आणि भाजपने सरकार स्थापन केले. पण, मागील महिन्याभरापासून भाजप आणि नितीशकुमार यांच्यामध्ये वाद चव्हाट्यावर आला आहे. आता बिहारमध्ये 11 ऑगस्टआधी एनडीए सरकार जाऊन नितीश कुमार आरजेडीसोबत (RJD) सरकार बनवणार का? अशा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच नितीशकुमार यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.
नितीशकुमार नाराज का?
मागच्या एका महिन्यात घडलेल्या घडामोडींवर नजर टाकली तर भाजप आणि नितीश कुमार यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याचं दिसत आहे. महिनाभरात 4 वेळा नितीश कुमार यांनी भाजपपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नितीश कुमार दोन आठवडे आधी कोरोना पॉझिटिव्ह आले होते, यानंतर 3 ऑगस्टला त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली.
-सगळ्यात आधी 17 जुलैला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली तिरंग्याबाबत देशाच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली, पण या बैठकीला नितीश कुमार गेले नाहीत.
– यानंतर 22 जुलैला तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाच्या भोजनासाठीही नितीश कुमार यांना बोलावण्यात आलं, पण या कार्यक्रमालाही ते गेले नाहीत.
– 25 जुलैला नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथग्रहण सोहळ्यालाही नितीश कुमार यांना बोलावण्यात आलं, यालाही नितीश कुमार यांनी दांडी मारली.
– 7 ऑगस्ट म्हणजेच आज नितीश कुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या नीती आयोगाच्या बैठकीला बोलावण्यात आलं, पण ते या बैठकीलाही आले नाहीत.