महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । राज्यात सरकार स्थापन होऊन तब्बल सव्वा महिना उलटल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. संबंधित खात्यांचे मंत्री आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्यामुळे जनतेची अनेक कामं खोळंबली आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिशेनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.
काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर गेले आहेत. याठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे अंतिम करण्याबाबत चर्चा होऊ शकते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या सकाळी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना मुंबईहून निरोप आल्याचं समजतं. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील नगरहून मुंबईसाठी रवाना झाले. मुंबईला रवाना होण्यापूर् त्यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं.