Weather Update Pune : पुण्यात पावसाचा जोर कायम ; घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । शहरातील पावसाचा जोर मंगळवारीही (ता. ९) कायम राहणार असून, बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तसेच याच काळात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडून अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मंगळवारी घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला असून, या काळात नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, अशी सूचनाही हवामान विभागाने दिली. राज्यभरात मॉन्सून सक्रिय झाला असून, रविवार (ता. ७)पासून शहरातही पावसाचा जोर कायम आहे. दिवसागणिक पावसाचा जोर काहीसा वाढत असून, बुधवार (ता. १०)पर्यंत ही स्थिती कायम राहील. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता घेतलेल्या निरीक्षणानुसार, शहरात मागील चोवीस तासांत ३६.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या कडेची झाडे उन्मळून पडण्याची शक्यता असून, सखल भागात पाणी साचणे, निसरडे रस्ते आणि मोठे खड्डे पडण्याची शक्यता हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी व्यक्त केली आहे. या काळात पुणेकरांनी घाटमाथ्यावर फिरायला जाणे टाळावे, असेही ते म्हणाले.

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तिन्ही धरण परिसरात सोमवारी पावसाने हजेरी लावली आहे. पानशेत धरण परिसरात दिवसभरात १५ मिमी, वरसगावमध्ये १६ मिमी, तर टेमघरमध्ये २५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणांत मिळून एकूण २१.५४ टीएमसी म्हणजे ७३ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

खडकवासला धरणात ४०.३५ टक्के म्हणजे ०.८० टीएमसी इतका पाणीसाठा आहे. पानशेत धरण ८३.५० टक्के भरले असून धरणात ८.८९ टीएमसी पाणीसाठा आहे. वरसगाव धरण ७५.३२ टक्के भरले असून धरणात ९.६५ टीएमसी पाणी आहे. टेमघर धरण ५९.२७ टक्के भरले असून धरणात २.२० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *