महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । आ. संजय शिरसाट यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झाला नाही. यामुळे ते नाराज असल्याची अटकळ व्यक्त केली जात आहे. त्यातच त्यांनी शुक्रवारी रात्री एका ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून करून आपल्यापुढे ठाकरेंच्या गटात परतण्याचा मार्ग अजूनही खुला असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. ‘आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपला समावेश झाला नाही, तर आपल्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत,’ हेच त्यांनी या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तातडीने हे ट्विट डिलीट केले. पण तोपर्यंत राजकीय वर्तुळात शिंदे गटातील शिरसाटांच्या कथित बंडाविषयी विविध चर्चांना सुरुवात झाली. यामुळे शिरसाटांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
काय म्हणाले शिरसाट
‘मी मंत्रिपदासाठी दबाव आणत नाही. एखाद्यावर विश्वास ठेवला किंवा एखाद्याला आपले मानले, तर त्याच्यासाठी मान कापली गेली तरी हरकत नाही. एकनाथ शिंदे जे भूमिका घेतील ती भूमिका आम्हाला मान्य असेल,’ असे संजय शिरसाट म्हणाले. ‘मातोश्रीवर पुन्हा जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलावी. त्यांनी भूमिका बदलली नाही, यामुळेच शिंदे साहेबांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवून 40 आमदार बाहेर पडले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर राहिलो तर ती आमची राजकीय आत्महत्या ठरली असती. यामुळे आम्ही बाहेर पडलो असून, शिवसेना म्हणूनच काम करतोय,’ असे ते म्हणाले. या माध्यमातून त्यांनी आपण मंत्रिपदासाठी दबाव आणत नसल्याची सारवासारव केली.
‘त्या’ ट्विटवर स्पष्टीकरण
‘मी उद्धव ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत केलेल्या भाषणाचे ट्विट केले होते. तेव्हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे तुम्ही कुटुंबप्रमुख असाल तर तुम्ही कुटुंबातील सर्वच सदस्यांची भूमिका लक्षात घेतली पाहिजे. स्वतःच्या नव्हे तर कुटुंबाच्या भावनांचा विचार केला पाहिजे, असे माझे आजही मत आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना कायम कुटुंबप्रमुख मानतो. पण त्यांनी आमच्या भावनांचा विचार केला नसल्याने आजची परिस्थिती उद्भवली,’ असे संजय शिरसाट म्हणाले.