महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत हे सध्या तुरुंगात आहेत. ईडी कोठडीतून त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आली आहे. राऊत सध्या ऑर्थर रोड कारागृहात कैदेत आहेत. त्यामुळे अटकेपूर्वी दिवसभर राजकीय धावपळीत व्यस्त असणारे संजय राऊत यांचा आर्थर रोड तुरुंगातील दिनक्रम आता समोर आला आहे.
संजय राऊत यांचा ऑर्थर रोड कारागृहातील कैदी नंबर 8959 आहे. संजय राऊत यांना सुरक्षितेच्या कारणास्तव इतर सामान्य कैद्यांपासून दूर ठेवण्यात आले आहे. आर्थर रोड तुरुंगात संजय राऊत ग्रंथालयातील वर्तमानपत्र, पुस्तके वाचतात. याशिवाय टीव्हीवर बहुतांश वेळ तेटीव्हीवरील बातम्या पाहून ते घडामोडींवर लक्ष ठेवतात.
राऊत यांनी जेल मधील स्टोर मधून एक वही व पेन घेतला आहे. वर्तमान पत्रात छापून आलेल्या बातम्यांच्या आधारे राऊत वहीत आपले विचार लिहित असतात. लिखाणात खंड पडू नये हे त्या मागचे कारण असावे. मात्र ते लिखाण त्यांच्यापर्यंत मर्यादित राहिल, ते बाहेर छापण्यासाठी दिले जाणार नाही आहे. संजय राऊत हे दिवसभरातील बराच वेळ लिखाणात व्यस्त असतात. कोर्टाच्या आदेशानुसार संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषध पुरवली जात आहेत.