महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । प्रसिद्ध युट्यूबर आणि डान्सर धनश्री वर्मा (Dhanashree Verma Instagram) हिचं इन्स्टाग्राम प्रोफाइल सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणाऱ्या धनश्रीच्या इन्स्टाग्रामवर तिचा नवरा युझवेंद्र चहलसोबतचे अनेक रोमँटिक फोटो आहे. मात्र आता या ‘मिसेस चहल’ने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरुन ‘चहल’ हे आडनाव हटवले आहे, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता धनश्रीच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर केवळ ‘धनश्री वर्मा’ असे तिचे लग्नापुर्वीचे नाव तिने ठेवले आहे.
युझवेंद्र आणि धनश्री यांनी २२ डिसेंबर २०२० रोजी लग्न केले होते. त्यांच्या लग्नातील रोमँटिक फोटोही या जोडीने अनेकदा शेअर केले आहेत. या कपलला विविध ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. धनश्री अनेकदा युझवेंद्रचा उत्साह वाढवण्यासाठी त्याची मॅच पाहण्यासाठीही पोहोचायची, तर युझीनेही तिच्यासाठी डान्स शिकण्याचा प्रयत्न केला आहे. धनश्री आणि युझवेंद्र यांचे डान्स व्हिडिओही चाहत्यांना आवडतात.
मात्र आता धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरील चहल हे आडनाव हटवल्याने चाहत्यांना प्रश्न पडला आहे की त्यांच्या या आवडत्या कपलमध्ये सारं काही आलबेल आहे की नाही? धनश्रीने इन्स्टावरुन ‘चहल’ हटवण्याव्यतिरिक्त एक गोष्ट घडली, ती म्हणते चहलने देखील एक फोटो शेअर केला होता ज्यात असे म्हटले होते की- ‘नवीन आयुष्य लोड होत आहे’. आता या दोन्ही घटना जोडत त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याचा अंदाज बांधला जातो आहे.
दरम्यान धनश्री किंवा चहलने त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरील जुने फोटो मात्र हटवले नाही आहेत. त्यांच्या रोमँटिक फोटोंची नेहमीच चर्चा असते. त्यामुळे चाहते अशी आशा व्यक्त करत आहेत की त्यांच्यामध्ये सर्वकाही ठीक असेल. याशिवाय त्यांच्या नात्यामध्ये काही बिनसलं आहे का, याबाबत कोणती अधिकृत माहितीही समोर आलेली नाही.