एकदाच नमुने घेऊन चालत नाही, तर पुनर्पडताळणीसाठीही नमुने घ्यावे लागतात.

Spread the love

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी। आकाश शेळके । करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संशयावरुन दाखल केलेल्या रुग्णांच्या निदानासाठी त्यांच्या घशातील लाळेचे नमुने घेण्याचे काम जोखमीचे असले तरी कान,नाक आणि घसा तज्ज्ञांना स्वत:ची काळजी घेत, ही जबाबदारी पार पाडावी लागते. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील पाच तज्ज्ञांनी गुरुवारी सकाळपर्यंत असे ६३७ नमुने घेतले होते. हे काम करणे म्हणजे वाघाच्या जबडय़ात हात घालण्यासारखेच असल्याची भावना डॉ. मधुकर राठोड यांनी व्यक्त केली.

एकदाच नमुने घेऊन चालत नाही, तर पुनर्पडताळणीसाठीही नमुने घ्यावे लागतात. प्रत्यक्ष उपचाराप्रमाणेच असे नमुने घेण्याचे कामही जबाबदारीने आणि जोखीम पत्करुन करावे लागते. सध्या दिवसाकाठी १५-१६ तास धावपळीत असणारे जालना जिल्हा शासकीय रुग्णालयातील शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड सांगत होते,की जिल्हा रुग्णालयात नाक, कान आणि घसा तज्ज्ञ डॉक्टर तीनच होते. आता त्यांच्या मदतीला एक प्रतिनियुक्तीवरील तसेच खासगी तज्ज्ञ उपलब्ध आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन रुग्णांचा अहवाल करोना आजाराची लागण झाली असल्याचे सांगणारा आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८३५ संशयितांना दाखल करुन घेण्यात आले. १०८ संशयित व्यक्ती गुरुवारी सकाळी विलगीकरण कक्षात होत्या.

१४ दिवसाच्या विलगीकरणानंतर जवळपास ४२५ व्यक्तींना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. त्यामुळे महिनाभरापासून डॉक्टर, परिचारिका आणि सफाई कर्मचारी यांना कायम धावपळीत राहावे लागते. वैयक्तिक संरक्षक साधने उपलब्ध आहेत. परंतु त्यामुळे अनेकदा तपासणीच्या वेळी बोलताना अडचण निर्माण होते. परंतु त्यामधूनही मार्ग काढावा लागतो.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकारातून आकारास आलेल्या १५० खाटांच्या करोना रुग्णालयाचे काम, दैनंदिन बैठका, वरिष्ठांना माहिती पाठविणे आदी कामांसह जिल्हा रुग्णालयात नेहमी उपचारांसाठी येणारे रुग्ण यांची काळजी घेतली जाते. त्यामुळे आपल्यासह सर्व डॉक्टरांनी सकाळी आठ-नऊ वाजता घर सोडले की रात्री परतण्यास किती वेळ होईल, याचा अंदाज नसतो.

करोना संदर्भात विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या संशयितांची आणि त्या व्यतिरिक्त अन्य नेहमीच्या दाखल असलेल्याची तपासणी दररोज करावी लागते. त्यामुळे कायम धावपळ असते, असे डॉ. राठोड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *