पुणे, पिंपरी चिंचवडमधील लॉकडाऊनचे निर्बंध कठोरपणे राबवा ; उपमुख्यमंत्री अजित पवार

Spread the love

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – पुणे : पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली त्यावेळी यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंटेंटमेंट परिसरातील लॉकडाऊनचे निर्बंध कठोरपणे राबवावेत, असे निर्देश आज येथे दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत अजित पवार यांनी यावेळी माहिती जाणून घेतली. तसेच योग्य ते उपाय सुचवून त्यावर गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्यूदर कमी करणे आवश्यक आहे. या भागात गर्दी होऊ नये, यासाठी येथील शॉपिंग मॉल कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्यात येऊ नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

आवश्यक ती मदत कोरोना प्रतिबंधासाठी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. पोलीस प्रशासनाने कठोरपणे कंटेंटमेंट भागात लॉकडाऊनची अंमलबजावणी करून कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. यापूर्वी क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींना वेळेत व चांगल्या दर्जाचे भोजन पुरवावे. शहरातील रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी झोपडपट्टी भागातील कुटुंबियांचे संस्थात्मक क्वारंटाइन करून त्यांना अन्नधान्य व अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे. प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले निर्बंध पाळून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *