महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । सलमान मुल्ला । कळंब । याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब तालुक्यातील नायगाव येथील दीक्षित कुटुंबातील पती-पत्नीने रविवारी (ता.२१) रात्री राहत्या घरातील पत्र्याखालील लोखंडी आडुला एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनास पाठवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.दीक्षित कुटुंब हे ८ दिवसांपूर्वीच पुण्याहून नायगावला राहायला आले होते अशी माहिती मिळाली आहे..
लोकांचे खाजगी कर्ज फेडण्यासाठी चार एकरपैकी दीड एकर जमीन विकली म्हणून प्रकाश आणि अश्विनी यांच्यामध्ये रोजच भांडण व्हायचे, असं प्रकाश यांच्या आई रतन दीक्षित यांनी सांगितलं. या प्रकरणी शिराढोण पोलीस स्टेशनला अद्यापपर्यंत कोणी तक्रार दिली नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.