महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । गणेशोत्सव हा कोकणातील महत्व पूर्ण सण. या सणासाठी आपल्या आवडत्या बाप्पासाठी कोकणवासीय चाकरमानी आर्वजुन कोकणातील आपल्या घरी जातो. मुंबई ते कोकण या प्रवासादरम्यान या गणेशभक्त चाकरमान्यांच्या प्रवासात वाहतुक कोंडीचे विघ्न येऊ नये यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झालं आहे. या निमित्ताने गृह विभागाने एक आदेशा जारी करून गणेशोत्सव काळात कोकणात (kokan) जाणाऱ्या रस्त्यांवर जड अवजड वाहतुकीस निर्बंध लागु केले आहेत.
गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीसाठी आणि परतीच्या प्रवासासाठी येत्या 27 ऑगस्ट पासुन ते दहा सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत मुंबई- गोवा महामार्गावरून (mumbai goa highway) सर्व जड – अवजड वाहनांना वाहतुकीस पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. ज्यामध्ये ज्या वाहनांची वजनक्षमता १६ टन किवा १६ टनापेक्षा जास्त आहे अशी जड अवजड वाहनं, ज्यामध्ये ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर इत्यादी वाहनांवर ही बंदी लागु असेल.
या आदेशातून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळण्यात आलं आहे. हा आदेश गृह विभागाचे सचिव राजेंद्र होळकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे.