आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने चिखली मोशी चरोली हौसिंग सोसायटी फेडरेशनचा पार पडला ऑनलाईन ‘वेबिनार’

Spread the love

 महाराष्ट्र 24 : ऑनलाईन: पिंपरी चिंचवड-करोना आपल्यातून लवकर जाणार नाही. त्यामुळे त्याच्यासोबत जगायला शिका, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. चिखली मोशी चऱ्होली हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने रविवारी दुपारी बारा वाजता आयोजित केलेल्या ऑनलाइन बैठकीत ते बोलत होते.

यावेळी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्‍त स्मिता पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक ऑनलाइन उपस्थित होते. पुढे बोलताना आयुक्‍त म्हणाले, करोना बाधित आणि त्याच्या संपर्कात आलेल्यांची करोना तपासणी महापालिका करीत आहे. सर्वांची तपासणी करणे महापालिकेला शक्‍य नाही आणि सध्या त्याची आवश्‍यकताही नाही.

कारण करोनाच्या एका तपासणीसाठी महापालिकेला चार हजार रुपये खर्च येतो. तर खासगी लॅबमधून तपासणी केल्यास सहा हजारांचा खर्च येतो. पिंपरी चिंचवड शहरात जे करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 80 टक्‍के रुग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. पिंपरी चिंचवड शहरात सध्या दर दहा दिवसांनी करोना बाधित रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. हाच दर पुण्यात पाच दिवसांवर आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालयात 90, भोसरी रुग्णालयात 10, जिजामाता रुग्णालयात 12 आणि खासगी रुग्णालयांमधील अतिदक्षता कक्षात 150 खाटा उपलब्ध आहेत. आपण एकाचवेळी आठ हजार रुग्णांवर उपचार करू शकतो, एवढी महापालिकेची तयारी आहे. त्यानंतरही आवश्‍यकता भासल्यास जिल्हा प्रशासनाच्या मदतीने ही संख्या वाढविण्यात येऊ शकते. मात्र आपण लॉकडाऊन आणि संचारबंदीचे पालन काटेकोरपणे करीत असल्याने ही वेळ आपल्यावर येणार नाही.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘नागरिक घाबरलेले असल्याने लक्षणे असूनही तपासणीसाठी पुढे येत नाही. शहरातील बिल्डरांनी आपल्याकडे असलेल्या मजुरांची काळजी घेतली पाहिजे, यासाठी प्रशासनाने त्यांना सूचना कराव्यात. जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा व अत्यावश्‍यक सेवेतील नागरिकांना पास देण्यासाठी आठपैकी चार प्रभागात सुविधा उपलब्ध करून द्यावी. सध्या एमआयडीसीमधील कंपन्या बंद आहेत. त्यामुळे एमआयडीसीचा पाणी पुरवठाही बंद आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचा तुटवडा भासत असल्याने एमआयडीसीचे पाणी शहराकरिता वापरण्यात यावे.’

यावेळी बोलताना पोलीस उपायुक्‍त स्मिता पाटील म्हणाल्या, सोसायटीमधील काही नागरिकांना विशेष पोलीस प्रतिनिधी म्हणून नियुक्‍त करण्याचा आमचा विचार आहे. सोसायटीमधील जे सदस्य संचारबंदी आदेशाचे पालन करणार नाहीत, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. यापूर्वीही अनेक ठिकाणी असे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ज्या भागातील मजूर रस्त्यावर येतील त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *