गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा; वर्धा जिल्ह्यात साकारला आगळा वेगळा सुरक्षित बाजार !

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन । बीड । विशेष प्रतिनिधी। आकाश शेळके। कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर राखण्याचा प्रयत्न सर्वत्र होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सोबतीला सामाजिक संस्था हातभार लावत आहे. वर्ध्याच्या सामाजिक संस्थानी पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनासोबत एक आगळी वेगळी संकल्पना राबवली आहे. केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावरील हा भाजी बाजार सध्या कोरोनाचा लढ्यात मदतगार ठरत आहे. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या संकल्पनेतून वर्धा शहरात गोल मार्केट व बजाज चौकात भरणारा भाजी बाजार 15 ठिकाणी स्थलांतरित केला होता. मात्र त्याठिकाणी स्वच्छतेची काळजी राखली जात नसल्याचे लक्षात येताच उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे आणि नगर परिषद मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांनी याबाबत सामाजिक संस्थांशी चर्चा केली. चर्चेतून पुढे आलेली आदर्श व सुरक्षित बाजाराची संकल्पना कोरोनाच्या युद्धात महत्त्वाची ठरत आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे उत्तम उदाहरण यानिमित्ताने वर्ध्यात पाहायला मिळाले.

प्रशासनाने केसरीमल कन्या शाळेचे मैदान उपलब्ध करून दिले. बाजार उभारण्यासाठी रोटरीने मनुष्यबळ, साहित्य आणि नियोजन करून दिले. नगरपरिषद वर्धा यांनी येथील स्टॉल्सचे वाटप, आणि तेथील साफसफाईची जबाबदारी घेतली. पोलीस प्रशासनाने तेथे होणारी गर्दी नियंत्रित करून प्रत्येक व्यक्ती रांगेतच येईल यासाठी नियोजन व काम केले.पैश्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून व्यावसायिक नितीन शिंदे यांच्यासह रोटरीच्या सदस्यांनी खर्चाचा भार उचलला.

असा आहे बाजार —- केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर 80 भाजी आणि फळ दुकानाची व्यवस्था करण्यात आली असून आज 60 पेक्षा जास्त दुकाने लागली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आगळावेगळा प्रयोग करताना बाजारात येणाऱ्याचे स्वागत करण्यासाठी स्वागत कमान, मैदानाच्या मध्यभागी एक डायस तयार करून ग्राहकांना कोरोनापासून सावध करण्यासाठी सिनेमाच्या आधारावर थीम बनविण्यात आल्या आहेत. यामध्ये बकेट लिस्ट, डार्लिंग, मुंबई- पुणे मुंबई, गच्ची या सिनेमाच्या थीम वापरून जनजागृतीपर संदेश देण्याचं कामही यावेळी करण्यात येत आहे. इथे येणाऱ्या नागरिकांना गेटपासून हात स्वच्छ धुण्याची ठीक ठिकाणी सोय, प्रत्येक दुकानासमोर सॅनिटायझरची बॉटल, तापमान पाहता हिरवी चटाई, दोन दुकानातील ठराविक अंतर, दुकासमोर गर्दी टाळत सोशल डिस्टनसिंग ठेऊन बसायला खुर्च्या, भाजी विक्रेत्याना मास्क आणि हॅन्डग्लोज, नागरिकांनी प्लास्टिकचा उपयोग टाळावा म्हणून कापडी पिशव्या अशा सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाजी बाजारातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका टळला म्हणायला सध्यातरी हा भाजी बाजार आदर्श ठरत आहे. कारण लोकांची सवय तोडायला गर्दी केल्यास लाऊडस्पीकरवर सूचना देण्याची व्यवस्थाही आहे.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिपचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रीती डुडुलकर, मुख्याधिकारी प्रदीप जगताप, रोटरीचे महेश मोकलकर, पंकज शर्मा, आसिफ जाहिद यांच्या उपस्थितीत बाजारास प्रारंभ झाला.

कोरोना संसर्गात मदत करण्यासाठी सर्वच सामाजिक संघटना पुढे आल्या आहेत. रोटरीने सेवाग्राम रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी युनिट तयार करून दिले. केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भाजी बाजाराला आपण स्वत: भेट दिली. अतियश शिस्तबद्ध आणि भाजी दुकानासमोर ग्राहकांना बसण्यासाठी दिलेल्या खुर्च्या, प्रत्येक दुकानादाराजवळ सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सामाजिक संस्था व नागरिकांच्या मदतीनेच वर्धा जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्यात यश मिळाले असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सांगितले.

भाजी बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी या भाजीबाजाराच्या उपक्रमाची चांगली मदत होत आहे. वर्धा जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहेच. या बाजारामुळे हिरव्या मॅटमध्ये सावलीत असणारा बाजार हा तापमाना सोबतच कोरोनाला सुद्धा लढा देईल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *