Eknath Shinde: , एकनाथ शिंदेंचं विरोधकांवर बरसले ; “हो मी कंत्राटी मुख्यमंत्री, मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलंय’’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । राज्यात नाट्यमय घडामोडी घडून सत्तांतर झाल्यानंतर होत असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. काल तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिंदे गट आणि विरोधी आमदारांमध्ये हमरीतुमरी झाली. या सर्वांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातून प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे म्हणाले की, आज माझा कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख झाला. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत काही विधान केले म्हणून त्यांना थेट जेवणावरून उचलून तुरुंगात टाकले होते. कशासाठी तर त्यांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केला म्हणून. पण आम्ही घटनेप्रमाणे, कायद्याप्रमाणे बहुमत सिद्ध करून पदावर बसलोय. आम्ही कायद्याविरुद्ध कुठलंही पाऊल उचलणार नाही. मी एकच सांगेन ही वैचारिक पातळी एवढी खालावली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितलं की, माझा कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख झाला. हो मी कंत्राटी मुख्यंमंत्री आहे. मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांच दु:ख दूर करण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व पुढे नेण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बाकी असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लगावला.

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी नाही केली. बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस राष्ट्रवादी आमचे शत्रू आहेत. त्यांना कधी जवळ करायचं नाही. त्यांना जवळ करायची वेळ येईल, तेव्हा मी माझं दुकान बंद करेन. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी, हिंदुत्वाशी गद्दारी केली असती तर आमच्या स्वागतासाठी हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा थांबले असते का, आमची भूमिका राज्यातील जनतेने मान्य केली आहे, सरनाईक यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही खुद्दार आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *