महाराष्ट्र 24- ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी।आकाश शेळके। करोनाच्या संसर्गामुळे मुंबईत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून अन्य आजार झालेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. वारंवार सांगूनही खासगी दवाखाने, नर्सिग होम सुरू करण्यात आली नाहीत, तर त्यांचे परवाने तात्काळ रद्द करावे, असेही आदेश पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी शनिवारी दिले. सोसायटय़ांच्या आवारातील नर्सिग होम, दवाखाने सुरू करण्यात अडथळा निर्माण करणाऱ्यांवरही कायद्याचा बडगा उगारण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
विविध आजारांमुळे अनेक नागरिक त्रस्त आहेत. त्यांना वेळीच उपचार मिळत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन खासगी दवाखाने आणि नर्सिग होम तात्काळ सुरू करण्याचे आदेश प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले होते. मात्र बहुसंख्य खासगी दवाखाने आणि नर्सिग होम अद्याप सुरू झालेली नाहीत. काही नर्सिग होम आणि दवाखाने सोसायटी, चाळीच्या आवारात किंवा भाडय़ाच्या जागेत आहेत. सोसायटी किंवा चाळीतील रहिवासी त्यांना अडथळा निर्माण करीत आहेत. अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या व्यक्तींविरुद्ध ‘साथरोग कायदा १८९७’नुसार कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.
..तर परवाना रद्द
पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत सर्वेक्षण करावे. नर्सिग होम बंद असल्याचे आढळल्यास त्यांचा परवाना तात्काळ रद्द करावा. खासगी दवाखाने बंद असल्यास ‘साथरोग कायदा १८९७’अन्वये कारवाई करावी, असे आदेश प्रवीणसिंह परदेशी यांनी विभाग कार्यालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. खासगी नर्सिग होम व खासगी दवाखाने यांनी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही दिले आहेत.