महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची न्यायालयीन लढाई निर्णायक टप्प्यावर आली असताना सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सरन्यायाधीश एम. व्ही. रमण्णा हे शुक्रवारी 26 ऑगस्टला निवृत्त होतायत. त्यामुळे आता या प्रकरणावर 29 ऑगस्टला देशाचे नवीन सरन्यायाधीश उदय लळीत यांच्यापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत शिवसेना आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवर सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान हे प्रकरण पाच सदस्यांच्या खंडपीठापुढे पाठविण्यात येईल. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगापुढील विषयासंदर्भात 25 ऑगस्टला निर्णय घेण्यात येईल, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आज काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र आज हे प्रकरण न्यायालयापुढे आलेच नाही.
मागच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुरू असलेल्या प्रकरणावर दोन दिवस कोणतीही कार्यवाही करू नये, असे निर्देश दिले होते. ही स्थगिती किती काळ कायम राहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.