एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे या मागण्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । अत्यंत कमी वेतनावर राबणाऱ्या आणि आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या 92 हजार एसटी कर्मचाऱ्यांची (ST Employees) रखडलेली वेतन निश्चिती करुन त्यांना समाजात सन्मानानं जगण्याची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी (Maharashtra ST Employees) काँग्रेसच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

6 महिने प्रदीर्घ संप करून एसटी कर्मचाऱ्यांच्या हाताला काहीच ठोस मिळालं नाही. दुर्दैवानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रचंड मानहानी झाली. सध्या एसटी महामंडळ आपल्या परीनं महाराष्ट्रातील जनतेची सेवा करीत आहे. परंतु एसटीचा हाच कर्मचारी अत्यंत खचलेला आणि निराश मनस्थितीमध्ये काम करत आहे. त्याना शासनानं हल्लीच देवू केलेली वेतन वाढ ही अनियमित आणि अत्यल्प असून, पूरक भत्ते आणि अनुषंगिक सुविधांसाठी त्याला पुन्हा आंदोलन करावं लागू नये, यासाठी त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणीही महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीनं बरगे यांनी केली आहे.

सध्या प्रमाणापेक्षा महागाई वाढली आहे. घरभाडं, किराणा सामान,औषधोचार आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च दुप्पटीनं वाढला आहे. यावर एखादा अभ्यासगट किंवा समिती निर्माण केली पाहिजे. त्या समितीला काल मर्यादा ठरवून देऊन, अभ्यास पूर्ण अहवालाच्या आधारे एसटीच्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती पुरक भत्ते आणि अनुषंगिक सुविधांच्या बाबतीत निर्णय घ्यावा, असंही या पत्रात त्यांनी म्हंटलं आहे.

या बरोबरच गेली 3 वर्ष एसटीतील चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी यांना गणवेश किंवा गणवेशाचे कापड दिले गेले नाही. ते कापड त्यांना तातडीनं द्यावे, याशिवाय शासानाप्रमाणे महागाई भत्ता देण्यात यावा. अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती रक्कम त्वरित दिली पाहिजे. कारण स्वतः आणि कुटुंबातील सदस्यांच्या औषधोचारासाठी अनेकांनी कर्ज काढलं असून हा खर्च काही लाखांच्या घरात आहे. विशेष म्हणजे, एसटी कर्मचाऱ्यांना बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्या राहण्या-जेवण्याची प्रचंड गैरसोय होत असून यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी तातडीनं लक्ष घालून त्यांच्यासाठी चांगली विश्रांती गृह आणि सुविधा निर्माण करण्यासाठी दुरुस्ती साठी निधी प्राप्त करून द्यावा, अशी विनंती केली आहे.

एसटी महामंडळाकडे सध्या ज्या बसेस उपलब्ध आहेत. त्यांतील बहुतांशी बसेसची अवस्था अत्यंत बिकट आहे. काही बसेसची आयुमर्यादा संपली आहे. नव्या बसेस घेण्याकरिता महामंडळकडे निधी नाही. त्यामुळे तात्काळ निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. कारण पुरेशा प्रमाणात बसेस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना चांगली सेवा देता येत नाही. महामंडळाचे उत्पन्न कमालीचं कमी झालं आहे. त्यामुळे महामंडळ प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

महामंडळाची बस बहुतांशी बस स्थानके आणि इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामध्ये असलेली चालक वाहक आणि कार्यशाळा विश्रांतीगृह यांची पडझड आणि दुराव्यस्था झाली आहे. कार्यालयीन इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. काही इमारती धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तरी इमारत दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *