महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । शिर्डीच्या साई मंदिरात हार-फुले घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे हार-फूल विक्रेते-व्यावसायिक आणि सुरक्षारक्षकांमध्ये आज जोरदार धुमश्चक्री झाली. साई मंदिर प्रशासनाने भाविकांना हार-फुले-प्रसाद घेऊन मंदिरात जाण्यावर बंदी घातली आहे. त्याविरुद्ध गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्याने आज उद्रेक झाला.
साई मंदिर प्रशासनाने हार-फुलांवर घातलेली बंदी उठवावी, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून शिर्डी येथील कार्यकर्ते दिगंबर कोते हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला हार-फुले विक्रेत्यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र याची दखल न घेतल्याने संतप्त आंदोलकांनी, विक्रेत्यांनी आज साई मंदिरात हार-फुले घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. या वेळी आक्रमक झालेले विक्रेते आणि सुरक्षारक्षकांमध्ये जोरदार झटापट झाली.
कोपरगावचे संजय काळे यांनी कोपरगाव ते शिर्डी असा 18 किलोमीटर पायी प्रवास करून मंदिरात फुले घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी फुले घेऊन जाण्यास मज्जाव केला.
फुलशेती करणारे शेतकरी, व्यावसायिक अडचणीत
गेल्या अनेक दशकांपासून शिर्डी परिसरातील शेकडो शेतकरी फुलशेती करतात, तर हजारो व्यावसायिक आणि मजुरांची उपजीविका या हार-फुले-प्रसाद विक्रीवर अवलंबून आहे. आम्ही जगायचे कसे, असा सवाल शेतकरी उपस्थित करताहेत. साईदर्शनाला येणाऱया भाविकांनाही समाधीवर हार-फुले, प्रसाद अर्पण करता येत नसल्याने नाराजी आहे. जर राज्यातील सर्व मंदिरांत कोरोनाचे निर्बंध हटविले गेले आहेत तर शिर्डीतच निर्बंध का, असा सवाल साईभक्त करीत आहेत.