महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र हात आखडता घेतल्याचे समजते. त्यामुळे आता विचारांचे सोने लुटण्याची संधी शिवसेनेला मिळणार, की एकनाथ शिंदे गटाला याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची यावरून संघर्ष सुरू आहे. शिवसेनेतील ४०हून अधिक आमदार आपल्याकडे खेचल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आता शिवसेना पक्षावरच दावा ठोकला असून, त्याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या दाव्याला पुष्टी मिळावी यासाठी दोन्ही गटांकडून सध्या पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्रे गोळा केली जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे शिवसेना; तसेच एकनाथ शिंदे गटाचे लक्ष लागले आहे. शिवाजी पार्क मैदानात गेली अनेक वर्षे न चुकता शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. पावसामुळे दोन-तीन वेळा मेळावा रद्द करण्याचा प्रसंग ओढवला होता.
पडद्यामागून हालचाली
शिवसेनेला परवानगी नाकारली गेल्यानंतर एकनाथ शिंदे गट या मेळाव्यासाठी परवानगी मागणार आहे. मात्र, परवानगी मिळाल्यास या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच मार्गदर्शन करणार का; तसेच त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मार्गदर्शन करणार का या सर्व बाबी अद्याप गुलदस्त्यातच आहेत.