Shivsena: ठाकरेना पुन्हा धक्का? शिवसेनेचे आणखी दोन आमदार शिंदे गटाच्या गळाला ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सतत पडझड सुरु असलेल्या शिवसेनेला आणखी दोन हादरे बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी लवकरच शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटतील, असा खळबळजनक दावा केला आहे. तसे घडल्यास हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मोठा धक्का असू शकतो. त्याचवेळी अगदी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले कोणते दोन शिलेदार त्यांची साथ सोडणार, याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे.

संदीपान भुमरे यांनी शनिवारी पैठण येथील कार्यक्रमात बोलताना हा दावा केला. त्यांच्या या दाव्याने शिवसेनेच्या गोटातील चिंता वाढली आहे. भुमरे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य यांच्यावर निशाणा साधत उद्धवसेनेचे दोन आमदार फुटणार असल्याचे म्हटले. उद्धव सेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच फुटून शिंदे सेनेत येणार आहेत. एक जण येऊन आम्हाला भेटला असून दुसरा सुद्धा संपर्कात असल्याचा दावा यावेळी भुमरे यांनी केला. यावेळी भुमरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला प्रचंड गर्दी झाली होती. हाच धागा पकडत संदीपान भुमरे यांनी त्यांना लक्ष्य केले. पैठणच्या बिडकीन गावात आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या सभेपेक्षा गारुड्याच्या खेळाला जास्त गर्दी होते, अशी खोचक टिप्पणी संदीपान भुमरे यांनी केली. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून यावर काय प्रतिक्रिया येणार, हे पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *